Sunday, 29 July 2018

चार्टर्ड फ्लाईट चा अनुभव


पण एक मजेशीर आश्चर्याचा   धक्का आम्हाला बसणार होता. साधारण ११ वाजता आम्ही विमानात प्रवेश केला.  विमानातील आमच्या अख्या कंपार्टमेंट मध्ये फक्त आम्ही अकरा जण होतो. त्यामुळे चार्टर्ड flight  मध्ये बसल्याचा अनुभव येत होता. फ्लाईट अटेंडट आमच्याच दिमतीला असल्याने मागू ती गोष्ट तत्परेने आंमच्या समोर येत होती . आमची चिल्ली पिल्ली आपल्या बाचे विमान असल्यासारखी पकडापकडी खेळत होती. त्यामुळे आमचा ९ तासाचा प्रवास सुखकर झाला.




पॅरिस एअरपोर्ट
आजी नातवंडांसह 
पण एक मजेशीर आश्चर्याचा   धक्का आम्हाला बसणार होता. साधारण ११ वाजता आम्ही विमानात प्रवेश केला.  विमानातील आमच्या अख्या कंपार्टमेंट मध्ये फक्त आम्ही अकरा जण होतो. त्यामुळे चार्टर्ड flight  मध्ये बसल्याचा अनुभव येत होता. फ्लाईट अटेंडट आमच्याच दिमतीला असल्याने मागू ती गोष्ट तत्परेने आंमच्या समोर येत होती . आमची चिल्ली पिल्ली आपल्या बाचे विमान असल्यासारखी पकडापकडी खेळत होती. त्यामुळे आमचा ९ तासाचा प्रवास सुखकर झाला.
        अखेर मजल दरमजल करीत रात्री आठ वाजता पॅरिसला पोहोचलो .एयरपोर्टला उतरता क्षणीच सुखद गारवा  जाणवू लागला. पॅरिसला रात्र खूप उशिरा होते .त्यामुळे तिकडे संध्याकाळचे आठ वाजले होते असेच म्हणावे लागेल. मंदारही एयरपोर्टला पोहोचत होता. तेथील एयरपोर्ट मेट्रो स्टेशनशी जोडले असल्याने मेट्रो स्टेशन जवळच होते. विमानात गर्दी कमी असल्याने आमचे ईमिग्रेशनचे सोपस्कारही लवकरच पूर्ण झाले.

यथावकाश  मंदार मधुरा भेटल्यावर त्यांच्या तर आनंदाला पारावरच राहिला नाही. भेटाभेटी झाल्यावर आम्ही तेथील  लोकल ट्रान्स्पोर्टचा पास काढला. तेथे मेट्रो, ट्रेन, बस ह्या सर्वांसाठी एकच पास चालतो. तेथिल  वाहतूक व्यवस्था वाखाणण्याजोगी आहे.वक्तशीरपणा तर कमालीचा अचंबित करणारा आहे.

रात्रीं दहा वाजता आम्ही आमच्या अपार्टमेन्टवर पोचलो. मधुराने तिच्या घरून छोले , दालफ्राय, जीरा राईस असे सुग्रास जेवण बनवून आणले होते. आणि आम्ही तयार पोळ्या बरोबर  नेल्या होत्या . सर्वाना प्रचंड भूक लागल्याने सर्वानी जेवणावर यथेच्छ ताव मारला. प्रवासाचं क्षीण सर्वानाच जाणवत होता . आयफेल टॉवरचा प्रवेश रात्री बारा वाजता बंद होतो. सर्व उरकेपर्यंत अकरा वाजले होते. मंदारने निर्वाणीचा  इशारा दिला. पॅरिसला जाऊन आयफेलचे  दर्शन न घेणे म्हणजे पंढरपूरला जाऊन विठू रायाचे दर्शन न घेण्यासारखे होते . अभि नही तो कभी नही ह्या न्यायला अनुसरून आम्ही घरून निघालो. आमची आयफेल बघण्याची इच्छा प्रबळ होती. हिंदी डायलॉग मारायचा झाला तर "पुरी कायनात हमे आयफेल दिखाने  में  जुट  गयी थी ."




बसही  वेळेवर  आली. अर्ध्यातासात आम्ही आयफेलजवळ पोचलो. गेटपाशी पोचेपर्यंत ११-४५ झाले होते . आम्ही  गार्ड कडे आशाळभूत नजरेने बघत होतो. त्याने प्रवेश बंद झाल्याचे सांगितले व दुसऱ्या गेटपाशी चौकशी करण्यास सांगितले. आमच्या आशा पल्लवित झाल्या.
मधुराने आमचे बुकिंग गार्डला दाखविले.  बुकिंगची वेळ तर कधीच टळून गेली होती. आम्ही देवाकडे प्रवेशासाठी याचना करीत होतो. अखेर त्याला पाझर फुटला व आम्हाला प्रवेश मिळाला. प्रवेशद्वारापाशीच  आम्हाला "अस्मान ठेंगणे होणे" ह्या म्हणीची प्रचिती आली. आयफेल टॉवर हा ३२४ मीटर उंचीचा महाकाय टॉवर आहे. १८८९ साली हा टॉवर  बांधला गेला. गुस्ताव आयफेल नावाच्या इंजिनीयरने ह्या टॉवरची संकल्पना मांडली . सुमारे ७३३० टन लोखंड व ६० टन रंग ह्या टॉवरच्या बांधकामासाठी वापरले गेले. टॉवरवर जाण्यासाठी एक अजस्त्र लिफ्ट आहे. आमचे बुकिंग समिट सेकशनचे होते, परंतु वेळ उलटून गेल्याने आम्हाला दुसऱ्या मजल्यावरच जाता आले.. मनात म्हंटले हे हि नसे थोडके. लिफ्टने आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो .  हा मजला ११५ मीटर वर आहे. तिथे पोचल्याक्षणीच थंडगार वारा अंगाला झोंबायला लागला. प्रचंड थंडी होती. हा मजला खुला असल्याने पॅरिसचे विहंगम द्रुष्य  दिसत होते. समोर अथांग पसरलेले क्षितिज, लाखो मिणमिणते दिवे , मुंगी एवढी दिसणारी माणसे , खेळण्यातल्या सारख्या दिसण्याऱ्या गाड्या, सगळंच विलक्षण....
हात थरथरत होते तरीही सेल्फीचा मोह आवरत नव्हता. हे सर्व डोळ्यात सामावून घेण्यासाठी आम्हाला फक्त १५-२० मिनिटाचा अवधी होता. त्या मजल्यावर एक दुर्बीण ठेवलेली होती. त्यातून दिसणारे  अवकाशातील तारे ओंजळीत भरून घ्यावेसे वाटत  होते. रात्री बारा वाजता दिव्यांच्या झगमगाटाने लखलखून गेलेला आयफेलही आम्हाला बघायला मिळाला .ती अथांगता डोळ्यात सामावून घेत असतानाच एका  महिला गार्डने आम्हाला नम्रपणे खाली जायची विनंती केली. पण अजून  समाधान झाले नव्हते . तिच्या विनंतीकडे  दुर्लक्ष करून आम्ही फिरत होतो. अखेर जड पावलांनी आम्ही त्या अद्भुत कलाकृतीचा  निरोप घेतला. पॅरिसमधील माणसे खडूस असतात असा लोकांनी आमचा  समज करून दिला होता पण आयफेलच्या निमित्ताने हा समज खोटा ठरला.

      आमच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली .प्रचंड वणवण झाल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता पण आयफेल काबीज केल्याचे समाधान वाटत होते. पाठ टेकताच झोपेने अमल सुरु केला. तेथे रात्र उशिरा होते पण दिवस लवकर सुरु होतो. पहाटे सहा वाजताच लक्ख   प्रकाश पडलेला असतो.

No comments:

Post a Comment

पूर्वरंग

आपल्या आयुष्य मध्ये काही गोष्टी इतक्या सहज जुळून येतात कि त्यामुळे आपल्याला   नियतीचे आभारच मानावेसे वाटतात .आमची पॅरिस वारी हा सुद...