Sunday, 29 July 2018

हो हो बस टूर


आमच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली .प्रचंड वणवण झाल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता पण आयफेल काबीज केल्याचे समाधान वाटत होते. पाठ टेकताच झोपेने अमल सुरु केला. तेथे रात्र उशिरा होते पण दिवस लवकर सुरु होतो. पहाटे सहा वाजताच लक्ख   प्रकाश पडलेला असतो.
वातावरण आल्हादायक असल्याने सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटत होते . दुसऱ्या दिवशी आमची  पॅरिस दर्शनची टूर होती. आपल्याकडे जसे मुंबई दर्शनाच्या बसेस असतात तश्या तेथे होहो ( HOP ON HOP OFF ) बसेस असतात. ह्या बसचा पास काढल्यावर तुम्ही हवे तेथे उतरू चढू किंवा उतरू शकता. आमच्या बसचा पहिला मजला खुला होता . बसमधे चढतानाच ड्रायव्हरने BON JOUR म्हणून आमचे स्वागत केले . किंबहुना सर्वच बस प्रवाशांचे स्वागत तेथील ड्राइवर अशारितीने रोज करीत असतात . हे हि तेथील लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. अनोळखी व्यक्ती जरी समोर आली तरी ते BON JOUR म्हणून शुभेच्छा देतात. आपल्याकडील बस ड्राइवर अश्या शुभेच्छा द्यायला लागला  तर दचकायलाच होईल.    
  
हो हो बस 

       आमचा पहिला थांबा नोट्रे दाम चर्चपाशी होता. १३४५ साली या कॅथेड्रलची स्थापना झाली. फ्रेंच गॉथिक स्टाईलने या कॅथेड्रलची बांधणी करण्यात आली आहे. टॉवरची ऊंची २२६ फूट आहे. आम्ही चर्चमध्ये प्रवेश केला तेव्हा तेथे धामिर्क विधी चालू होता.बिशप लोकांना उद्देशून प्रवचन करत होता. नंतर  एक पारंपरिक मिरवणूक निघाली. चर्च मधील भव्यता , रोषणाई, पौराणिक संदर्भ  असलेली शिल्पे , पाहून आमचे डोळे दिपले. नोट्रे डॅम  समोरच बेकरीच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले होते. 


तुमच्या समोरच तुम्हाला गरमागरम पिझ्झा, क्रोसाँट्स ,सँडविचेस बनवून दिले जात होते. आम्ही मस्तपैकी पिझ्झ्यावर ताव मारला तसेच  क्रोसाँट्सचा हि आस्वाद घेतला आणि पुढील प्रवासाला लागलो. हो हो बसमधून  पॅरिस बघताना जुन्या इंग्लिश चित्रपटातील दृश्ये बघितल्याचा भास होत होता. आधुनिकते बरोबर पुरातन वास्तू जपण्याचा फ्रेंच लोकांचा गुण वाखाणण्याजोगा आहे. वास्तुशास्त्रातील गॉथिक पद्धतीचा जन्म पॅरिस मध्येच झाला . बहुतांश इमारती ह्याच पद्धतीने बांधलेल्या दिसतात.
नोट्रे दाम चर्च

आमचा दुसरा  थांबा arc de triomphe पाशी होता. आपल्या गेट वे ऑफ इंडियाची आठवण करून देणारी हि वास्तू आहे. नेपोलियनचे सैनिक जे फ्रान्ससाठी लढून हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ ह्या वास्तूची निर्मिती करण्यात आली आहे. एडवर्ड ब्रॅन्ड्ट ह्या शिल्पकाराला थेथे त्या योध्यांच्या स्मरणार्थ ज्योतीची  रचना करण्यास सांगण्यात आले. आणि ११ नोव्हेंबर १९२३ रोजी ती ज्योत पेटवण्यात आली, व आता पर्यंत ती अखंड तेवत आहे. arc de triomphe समोर एक मोठा सहा पदरी रस्ता आहे . रस्त्याच्या मधोमध उभे राहून तुम्ही फोटो काढू शकता, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.
arc de triomphe


     त्या शहरात पादचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. तुम्हाला  रस्ता ओलांडायचा असल्यास मोटारी  थांबतात . झेब्रा क्रोसिंगवरून रस्ता ओलांडणे अनिवार्य आहे. ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंडही होऊ शकतो. आपल्याकडील "चलता  है " वृत्ती चालत नाही.

हि सर्व स्थळे बघेपर्यंत दुपार टाळून गेली होती. संध्याकाळची ५-३० वाजताची आमची सीन नदीची  cruze सफर होती. हि नदी पॅरिसच्या अगदी मध्यातून वाहते . तिचा तो शांत प्रवाह पाहून "संथ वाहते कृष्णामाई " ह्या बाबूजींच्या गाण्याची आठवण होते. ह्या नदीचा प्रवाह नागमोडी आहे. एकदंरीत ३२ पूल ह्या नदीवर आहेत. क्रूझ मधून प्रवास करताना आपल्याला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याची प्रतिकृती, अलेक्सान्डर  ब्रिज ह्यांचे दर्शन होते. .तासाभरात आमची टूर संपते . भुकेने कावळे ओरडायला लागलेले असतात . तेथून जवळच खाऊ गल्ली आहे. तेथे फलाफल नावाचा अत्यंत चटपटीत पदार्थ मिळतो. मैद्याच्या पोळी मध्ये सलाड्स, विविध प्रकारचे सौस. काबुली  चण्याची पेस्ट आणि कबाब  असे लपेटून दिले जातात. एक फलाफल खाल्ल्याने पोट भरते. कार्यक्रमांनी भरगच्च अश्या ह्या दिवसाची सांगता होते.
अलेक्झांडर ब्रीज 

सीन नदी 


1 comment:

  1. राहुल प्रवास वर्णन मस्त.सगळं अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.तुझी फोटोग्राफी तर अफलातूनच

    ReplyDelete

पूर्वरंग

आपल्या आयुष्य मध्ये काही गोष्टी इतक्या सहज जुळून येतात कि त्यामुळे आपल्याला   नियतीचे आभारच मानावेसे वाटतात .आमची पॅरिस वारी हा सुद...