दुसऱ्यादिवशी आमचा ungfrau शिखरावर जाण्याचा बेत होता . ungfrau हे युरोप मधील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची सुमारे ११००० फूट आहे. इथे जायला ३ ट्रेन्स बदलायला लागतात. लुसर्न ते इंटरलाकेन हा २ तासाचा प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये आम्ही जे निसर्ग सौंदर्य बघितले त्याला तोड नाही. कुसुमाग्रजांची " हिरवे हिरवे गार गालिचे " हि कविता आम्ही साक्षात अनुभवत होतो. कॅमेऱ्यामध्ये काय टिपू आणि काय नको असे झाले होते .परमेश्वराने सढळ हस्ते है प्रदेशावर सौंदर्याची उधळण केली आहे. ह्या प्रदेशातील सर्व टुमदार घरे एका विशिष्ट पद्धतीने बांधली आहेत. घरासमोर पसरलेली हिरवळ बघून तर आम्हाला लोळणंच घ्यावीशी वाटत होती. मधूनच सूर्याची किरणे डोकावत होती त्यामुळे क्षितिजावर सोनेरी छटा उमटत होती.
इंटरलाकेन स्टेशनला उतरल्यावर कडाक्याची थंडी होती. अंदाजे ४ डिग्री पर्यंत तापमान खाली उतरले होते. ह्या स्टेशनवरून आम्हाला kleinn schedeigg स्टेशनवर जायचे होते. तेथून cogwhil ट्रेनने उंगफ्रू स्टेशनवर उतरायचे होते .
| कॉगव्हील ट्रेन |
हे स्टेशन एका डोंगरामध्ये पोखरून बांधले आहे. तिथे उतरल्यावर आपण एका प्रचंड गुहेमध्ये शिरतो. आतमध्ये शिरल्यावर तेथील कामगारांनी ungfrau ठिकाण बांधण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे चित्ररूपी दर्शन होते. त्यावेळी वापरलेली अवजारे, कंदील, दोरखंड हेही ठेवलेले असतात . ते पार करून आम्ही एका बर्फाच्या गुहेत शिरलो. तेथे बर्फातून बनवलेली शिल्पे उभी केली आहेत. वेगवेगळ्या रंगाचे दिवे बर्फातून सोडल्यामुळे वेगळेच वातावरण तयार झाले होते. थोडे पुढे गेल्यावर एका डोम मध्ये चारही बाजूनी मोठ्या ४D स्क्रीन लावल्या होती. त्या डोमच्या बरोबर मध्ये उभे राहून उन्फ्राऊची ड्रोन मधून घेतलेली विहंगम दृष्ये दाखविण्यात येतात. आम्ही भारलेल्या मनःस्थितीत मार्गक्रमण करत होतो. ह्या शिखरावर जाण्यासाठी लिफ्टने जावे लागते. वर गेल्यावर एका गेट मधून शिखरावर प्रवेश करता येतो. आम्ही पोचलो तेव्हा स्नोफॉल चालू होता . भुरुभुरु बर्फाचा शिडकाव चालू होता .शिखर तर बर्फाने आच्छादलेले होते. आम्हीही बर्फामध्ये लोळण्याचा , बर्फ उडविण्याचा मनसोक्त आनंद घेतला. १०-१५ मिनिटांनी थंडीमुळे हाताची बोटे, हातमोजे असून सुद्धा बधिर झाल्याचे जाणवू लागले. बोचऱ्या वाऱ्यामुळे डोळे उघडणेही अशक्य झाले होते.
तेव्हा आम्ही आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला . थोडा सूर्यप्रकाश असता तर निसर्गसौंदर्याची मजा अनुभवता आली असती. पण ते होणे नव्हते. तहानभूक हरपून आम्ही जे डोळ्यात साठवता येईल ते साठवत होतो. आमची संध्याकाळची ५-३० वाजताची ट्रेन होती . आमच्याकडचे सर्व खाद्यपदार्थ संपले होते . इंटरलाकेनला आलो तेथेही खाण्याची वानवा होती. इंटरलाकेन ते लुसर्न अडीच तासाचा प्रवास होता.. तेथील ट्रेनमध्ये मिनी कॅफेस असतात , त्या भरोशावर आम्ही बिनधास्त होतो . परंतु आमच्या दुर्दैवाने ट्रेनमधील कॅफेही बंद झाले होते. लुसर्नला पोचेपर्यंत मुले भुकेने रडकुंडीला आली होती आणि आम्ही मोठे असल्यामुळे रडूही शकत नव्हतो. अखेर रात्री बारा वाजता लुसर्नला पोचल्यावर पुन्हा एकदा बर्गर किंग आमच्या क्षुधाशांतीस धावून आले. अपार्टमेंटमध्ये पोचेपर्यंत आम्ही गर्भगळीत झालो होतो.





No comments:
Post a Comment